मूल तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे विमान दुर्घटनेत अकस्मात निधन झाले.दादाचे अस्थीकलश मुल येथे दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. याप्रसंगी शहरातील नागरिकांनी दादाच्या अस्थीकलशाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. श्रद्धांजली कार्यक्रम पूर्ण होताच दादावर प्रेम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांनी दादाची स्वच्छतेची शिकवण कायम ठेवत श्रद्धांजलीसाठी वाहिलेली फुले आणि खाली पडलेले इतर साहित्य जमा करून फुलाचे तलावात तर बाकी साहित्य कचराकुंडीत टाकून दादाची शिकवण आमच्या म्हणात कायम असल्याचा कृतीतून संदेश दिला.
अजितदादा महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक पटलावर काम करताना त्यांनी नेहमी स्वच्छतेवर भर दिला आहे. यासाठी त्यांनी अनेकदा चुकीचे वर्तन करणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही खडसावतानाही बघितले आहे. यातून अधिकारीसुद्धा सुटले नाही. एवढंच नाही तर प्लास्टिकमुक्तीसाठी पण त्याचा नेहमी कटाक्ष असायचा. दादांना भेटण्यासाठी गेल्यावर सोबत नेलेल्या पुष्पगुच्छला जर प्लास्टिक असेल तर दादा लगेच ते प्लास्टिक काढण्यासाठी सांगून खिशात ठेवायसाठी सांगायचे. यातून दादाचे लहानसहान बबिवर किती बारीक लक्ष असायचे हे प्रतीत होते. असा महाराष्ट्र राज्याच्या जनतेच्या मनावर अधिराज्य गाजविणारा लोकनेता अचानक काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे राज्यातील जनतेला मोठा धक्का बसलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दादाच्या अस्थीकलशचे दर्शन घेण्याचा कार्यक्रम सुरु आहे. मुल येथेही अस्थीकलश दर्शन कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रम सपताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीताताई गेडाम, सरिताताई पोटवार, धाराताई मेश्राम, शीतलताई वाढगुरे, सुवर्णाताई रामटेके या महिला कार्यकर्त्यांनी दादानी आपल्या कृतीतून दिलेली स्वच्छतेची शिकवण कायम ठेवत श्रद्धांजली परिसराची स्वछता करून त्याचे योग्य ठिकाणी विसर्जन केले.




