भाजप कार्यकर्ते व समाजबांधव यांच्या ठिय्या आंदोलन :- भाजपा शहराध्यक्ष ठिय्या आंदोलन नगर परिषदेवर धडकणार
✍️देव पिंपळे मुल प्रतिनिधी ✍️, : मुल शहरात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौकाच्या सौंदर्यीकरणाच्या कामात होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) दुपारी २ वाजता नगर परिषद मुल येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण मोहूर्ले यांनी दिली.
प्रवीण मोहूर्ले यांनी आरोप केला की, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाच्या सौंदर्यीकरणास प्रशासकीय मंजुरी मिळून तब्बल नऊ महिने उलटून गेले आहेत. मात्र, नगर परिषद मुलचे मुख्याधिकारी आणि संबंधित अभियंता यांनी अद्यापही स्मारकासाठी आवश्यक जागेचे मोजमाप करून दिलेले नाही. या संदर्भात अनेक सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांनी वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही.
या विलंबामुळे माळी समाजासह महात्मा फुले यांच्या विचारांवर श्रद्धा असलेल्या नागरिकांच्या भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप मोहूर्ले यांनी केला. तसेच, नगर परिषद कुणाच्या तरी दबावाखाली कामकाज करत असून, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना व स्मारकाला दुय्यम वागणूक देण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाला जागे करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून, शेकडो समाजबांधव आणि भाजप कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार आहेत. हे आंदोलन मंगळवारी, ४ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता नगर परिषद मुल येथे होणार असून, सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रवीण मोहूर्ले यांनी केले आहे.