मूल शहरातील पडलेले दुभाजक होणार विकसित;
महामार्गाचीही होणार दुरुस्ती
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सकारात्मक प्रतिसाद
मूल प्रतिनिधि:-, मूल शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकांची झालेली दुरवस्था तसेच रस्त्याच्या आवश्यक दुरुस्तीचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. माजी मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० अंतर्गत मूल शहरातील सुमारे २.७९७ किलोमीटर अंतराच्या सुधारणा कामाला मंजुरी मिळाली असून, यासाठी तब्बल ४ कोटी ७.३ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले.
मूल शहरातून जाणारा सुमारे तीन किलोमीटर लांबीचा सिमेंट काँक्रीटचा रस्ता आणि त्यावरील दुभाजक आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नातून साकारण्यात आला होता. या रस्त्यामुळे मूल शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडली होती. बाहेरील गावांमधून येणाऱ्या नागरिकांमध्येही या रस्त्याची चर्चा होत असल्याने मूल शहराला या विकासकामामुळे एक वेगळी ओळख मिळाली होती.
मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे मागील काही महिन्यांपासून या रस्त्यावरील दुभाजक ठिकठिकाणी खचले होते. त्यामुळे शहराच्या सौंदर्यावर परिणाम होण्यासोबतच वाहतुकीच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला होता. विकासाचे प्रतीक ठरलेला हा मार्ग दुरवस्थेकडे जात असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
ही बाब भाजपा नेत्यांनी तसेच अन्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिली. नागरिकांच्या समस्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी मुनगंटीवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मूल शहरातील महामार्ग व दुभाजकांच्या दुरुस्तीची आवश्यकता त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० अंतर्गत २.७९७ किलोमीटर अंतराच्या सुधारणा कामाला मंजुरी देण्यात आली आहे. या कामात सुमारे २.५ किलोमीटर लांबीचे दुभाजक विकसित करणे, ३०० मीटर लांबीच्या नालीचे बांधकाम, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, थर्मोप्लास्टिक पेंटद्वारे रोड मार्किंग करणे, आवश्यक ठिकाणी दिशादर्शक व इशारा फलक बसविणे तसेच वाहतूक सुरक्षिततेसाठी रंबल स्ट्रिप्स बसविणे आदी कामांचा समावेश आहे.
या कामामुळे मूल शहरातील महामार्गाचा चेहरामोहरा पुन्हा बदलणार असून, वाहतुकीची सुरक्षितता वाढण्यासोबतच शहराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे. नागरिकांनी या विकासकामाचे स्वागत केले असून, आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे मूल शहरातील महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागल्याची भावना व्यक्त होत आहे.
भूमिपूजन कार्यक्रमास भाजपा शहराध्यक्ष प्रविण मोहुर्ले, भाजपा मूल तालुकाध्यक्ष चंदू मारगोनवार, भाजपा ज्येष्ठ नेते मोतीलाल टहलियानी, अविनाश जगताप, अजय गोगुलवार, प्रा. डॉ. सौ. किरणताई कापगते-बोरकर, जिल्हा युवा महामंत्री राकेश ठाकरे, महामंत्री जितेंद्र टिंगुसले, प्रशांत बोबाटे, प्रा. संजय येरोजवार, विवेक मांडाळे, युवराज चावरे, सुनील कुकुडकर, रुपेश निकोडे, दीपक बोर्डावार, योगेश लेंगुरे, संकेत निकुरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मूल शहराच्या विकासाला गती देणाऱ्या या महत्त्वपूर्ण कामामुळे शहरातील नागरिकांना अधिक सुरक्षित, सुस्थितीत आणि सुशोभित महामार्गाची सुविधा उपलब्ध होणार आहे.