Wednesday, April 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedमिशन लक्षवेध अंतर्गत बॉक्सिंगसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी १३ एप्रिलला

मिशन लक्षवेध अंतर्गत बॉक्सिंगसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी १३ एप्रिलला

क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी २० खेळाडूंची होणार निवड; पात्र खेळाडूंनी अर्ज करण्याचे आवाहन. गडचिरोली प्रतिनिधी:-

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन लक्षवेध’ योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात खेळाडू निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेद्वारे ऑलिम्पिक स्तरावरील १२ क्रीडा प्रकारांवर विशेष लक्ष केंद्रित करून राज्यातील क्रीडा पायाभूत सुविधा, प्रशिक्षण व्यवस्था, स्पर्धा आयोजन, क्रीडा वैद्यकशास्त्र, खेळाडू प्रोत्साहन व करिअर मार्गदर्शन यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा शासनाचा मानस आहे.

मिशन लक्षवेध अंतर्गत राज्यस्तरावर उच्च कार्यक्षमता केंद्र, विभागीय स्तरावर क्रीडा उत्कृष्टता केंद्र तसेच जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र कार्यान्वित करण्यात येत असून गडचिरोली जिल्ह्यात बॉक्सिंग या क्रीडा प्रकारासाठी २० गुणवंत खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.

सदर निवड चाचणीमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंचे वय ३१ डिसेंबर २०२६ रोजी २१ वर्षांखालील असणे आवश्यक आहे. खेळाडू हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा तसेच शालेय अथवा अधिकृत क्रीडा स्पर्धांमध्ये किमान राज्यस्तरावरील सहभाग अथवा पदकप्राप्ती असणे आवश्यक आहे. मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीचे मूल्यमापन करून कौशल्य व शारीरिक तंदुरुस्ती चाचण्यांद्वारे अंतिम निवड केली जाणार आहे.

अर्जासोबत जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, शासन मान्यताप्राप्त वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधारकार्ड, क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे, तीन पासपोर्ट आकाराचे फोटो, शाळा/महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र तसेच पालकांचे संमतीपत्र जोडणे आवश्यक आहे.

निवड झालेल्या खेळाडूंना पूरक आहार, गणवेश, क्रीडा साहित्य, प्रशिक्षक मार्गदर्शन, वैद्यकीय सुविधा, विमा तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागासाठी लागणारा खर्च योजनेअंतर्गत करण्यात येणार असून हे केंद्र अनिवासी स्वरूपाचे राहणार आहे. पात्र खेळाडूंची निवड तज्ञ समितीद्वारे करण्यात येईल.

जिल्हास्तरीय बॉक्सिंग निवड चाचणी दि. १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता क्रीडा प्रबोधिनी, पोटेगाव रोड, गडचिरोली येथे होणार आहे. इच्छुक खेळाडूंनी आपले अर्ज विहित नमुन्यात संपूर्ण कागदपत्रांसह दि. ११ एप्रिल २०२६ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा व सांस्कृतिक भवन कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे प्रत्यक्ष किंवा dsogad2@gmail.com या ई-मेलवर सादर करावेत.

अधिक माहितीसाठी निवड चाचणी आयोजन समिती प्रमुख एस. बी. बडकेलवार (मो. क्र. ९५०३३३११३३) यांच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील पात्र खेळाडूंनी या संधीचा लाभ घेऊन मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments