उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांना केंद्रीय अती उत्कृष्ट सेवा पदक
मूल प्रतिनिधि: उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित शशिकांत आमले यांना केंद्रीय सरकारच्या अती उत्कृष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर येथे झालेल्या मुख्य शासकीय समारंभात जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.
सत्यजित आमले यांनी पोलीस खात्यात तब्बल २५ वर्षांची गुणवत्तापूर्ण सेवा बजावली आहे. सेवाकाळात गडचिरोली, नाशिक, मुंबई आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. विविध ठिकाणी कार्यरत असताना प्रत्येक घटनेत न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
मागील वर्षी त्यांची चंद्रपूर जिल्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. सध्या मूल, सावली आणि पोभुर्णा या तीन पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्राची जबाबदारी ते सांभाळत आहेत. सर्वांना सोबत घेऊन मिसळून काम करण्याची त्यांची कार्यपद्धती जनसामान्यांमध्ये विशेष पसंतीस उतरली आहे.
कर्तव्य बजावताना दाखविलेली गुणवत्ता आणि उत्कृष्ट सेवेची दखल घेत त्यांना यावर्षी केंद्रीय सरकारचा अती उत्कृष्ट सेवा पदक मिळाले. यापूर्वीदेखील पोलीस महासंचालकांकडून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे.
सत्यजित आमले हे मनमिळावू स्वभावाचे अधिकारी म्हणून परिचित असून त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल नागरिकांमध्ये विशेष आपुलकी आहे. केंद्रीय सरकारच्या या प्रतिष्ठेच्या सन्मानामुळे चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
नागरिकांच्या सुरक्षेला आणि जनहिताला प्राधान्य देत यापुढेही कर्तव्य बजावणार असल्याचा निर्धार त्यांच्या कार्यातून दिसून येतो. या उल्लेखनीय सन्मानाबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांचे सर्व स्तरातून मूल , सावली, पोभुर्ण तालुक्यातून अभिनंदन होत आहे.





