Sunday, August 23, 2026
Google search engine

आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करा:- कु.रिना मसराम यांच्या नेतृत्वात भाजप आदिवासी आघाडीची सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
मूल प्रतिनिधि:
धानोरा (जि. गडचिरोली) तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन निष्पाप आदिवासी विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या क्रूर व बेजबाबदार घटनेचा तीव्र निषेध नोंदवत, दोषी संस्थाचालक, मुख्याध्यापक व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी (मूल शहर) च्या वतीने आमदार तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आले.
१५ ऑगस्ट २०२६ रोजी मूल येथे आयोजित ‘तिरंगा रॅली’ दरम्यान भाजप आदिवासी आघाडीच्या शहर अध्यक्षा कु. रिना रामभाऊ मसराम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन सुपूर्द केले. ही घटना केवळ अपघात नसून प्रशासन व संस्थाचालकांच्या गंभीर निष्काळजीपणाचा परिणाम आहे, असा आरोप याप्रसंगी करण्यात आला.
प्रमुख मागण्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा: घटनेस जबाबदार संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि प्रकल्प अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा (BNS/IPC कलमांनुसार) गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी.
मान्यता रद्द व पुनर्वसन: सुरक्षेची कोणतीही सोय नसलेल्या या आश्रमशाळेची मान्यता तातडीने रद्द करून उर्वरित विद्यार्थ्यांचे सुरक्षित शासकीय आश्रमशाळांमध्ये पुनर्वसन करावे.
आर्थिक मदत व शासकीय सेवा: मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबांना शासनाकडून प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत मिळावी व प्रत्येक सख्ख्या वारसाला शासकीय सेवेत सामावून घ्यावे.
सुरक्षा ऑडिट व आरोग्य सुविधा: चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांचे ‘सुरक्षा व आरोग्य ऑडिट’ करावे. तसेच सर्व ठिकाणी २४ तास सर्पदंश प्रतिबंधक लस (Anti-Snake Venom), प्रथमोपचार व रुग्णवाहिका सक्तीची करावी.
या निवेदनाची प्रत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडेही पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी सौ. संजना मडावी, प्रशांत सिडाम, सौ.शिवानी आगडे, सौ. इंदुताई मडावी, सौ. ममता कुसराम, सौ. गीता अमदुर्तीवार, सौ. माधुरी चिंचोलकर, सौ. कल्याणी मांदाडे, श्रीमती पुष्पा मसराम, श्री अतुल मडावी, विभा मुनघाटे यांच्यासह बहुसंख्येने आदिवासी महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous article
Next article
RELATED ARTICLES

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments