मूल पोलिसांची मोठी कारवाई – कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या गोवंश वाहतूक करणारा ट्रक पकडला; सुमारे ₹13.26 लाखांचा मुद्देमाल

✍️देव पिंपळे मुल प्रतिनिधी ✍️ मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली मूल पोलिसांनी कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या गोवंश वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध प्रभावी कारवाई करून मोठे यश संपादन केले आहे.
दि. 26/07/2026 रोजी रात्री पोलीस उपनिरीक्षक रुपेश कुंभरे हे पोलीस अंमलदारांसह डिव्हिजन गस्त करीत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, टाटा आयशर मालवाहू वाहन क्र. CG-04-PM-3377 मधून चंद्रपूर मार्गे गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक केली जात आहे. माहितीची खातरजमा करून रेल्वे फाटक परिसरात सापळा रचण्यात आला. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिला असता चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून वाहनाचा शोध घेतला असता चालक अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून फरार झाला.
वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अत्यंत अमानुष पद्धतीने एकमेकांना दाटीवाटीने बांधून, चारा व पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता ३८ गोवंशीय जनावरे (गायी, बैल, गोरे व कालवडी) कोंबून भरलेली आढळली. यातील ३ गोवंशीय जनावरे मृत अवस्थेत आढळून आली. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून जिवंत जनावरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच मृत जनावरांचे शवविच्छेदन करण्यात आले.
सदर कारवाईत अंदाजे ₹10,00,000/- किंमतीचा टाटा आयशर ट्रक व सुमारे ₹3,26,000/- किंमतीची 38 गोवंशीय जनावरे असा एकूण ₹13,26,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 281, 325 तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, 1976 चे कलम 5(अ), (ब), 9 आणि प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम, 1960 चे कलम 11(1)(A), (D), (E), (F) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुल श्री. सत्यजित आमले साहेब व पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन मुल श्री. विजय राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ,पोलीस उपनिरीक्षक रुपेश कुंभरे व पोलीस अंमलदार नरेंद्र वाकडे (ब.नं. 2623), पोलीस स्टेशन मुल यांनी केली असून पुढील तपास पोलीस स्टेशन मुल करीत आहेत. ही कारवाई मुल पोलीस स्टेशन केली आहे हे विशेष




