गडचिरोली पोलिसांचा मोठा दणका: अहेरी उपविभागात १ कोटींची अवैध दारू ‘रोड रोलर‘ फिरवून नष्ट!

🖋️उमेश गझलपलीवार गडचिरोली प्रतिनिधी🖋️:- गडचिरोली जिल्ह्यात कडक दारूबंदी असतानाही चोरट्या मार्गाने येणाऱ्या अवैध मद्याविरोधात पोलिसांनी आपला हिसका दाखवला आहे. अहेरी उपविभागांतर्गत येणाऱ्या चार पोलीस स्टेशनच्या हद्दीत विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल १ कोटी ३२ हजार ६७५ रुपये किमतीचा मुद्देमाल आज, २ एप्रिल २०२६ रोजी कायदेशीर प्रक्रियेद्वारे नष्ट करण्यात आला.
या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

पोलीस ठाण्यांमध्ये जप्त केलेली दारू साठवण्यासाठी जागेची अडचण निर्माण होत होती, तसेच हा मुद्देमाल नाशवंत असल्याने तो निकाली काढणे आवश्यक होते. त्यानुसार मा. न्यायालय आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची रीतसर परवानगी घेऊन १५९ गुन्ह्यांमधील मुद्देमालाची विल्हेवाटाची प्रक्रिया राबवण्यात आली.
अहेरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन पंचांच्या उपस्थितीत ही विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया पार पडली. प्रथम एक १५ बाय १५ फुटांचा मोठा आणि खोल खड्डा खोदण्यात आला. कडक व मुरमाड जमिनीवर दारूच्या सर्व बाटल्या पसरवण्यात आल्या. त्यानंतर रोड रोलरच्या साहाय्याने काचेच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचा पूर्णपणे चुरा करण्यात आला.
हा संपूर्ण कचरा जेसीबीच्या साहाय्याने खड्ड्यात टाकून तो व्यवस्थित बुजवण्यात आला.
महत्त्वाची बाब: ही संपूर्ण प्रक्रिया राबवताना पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही, याची पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली.
ही कारवाई गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा (प्राणहिता) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आली.




