जानाळा–पोंभूर्णा रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात काँग्रेसचे चक्काजाम; लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
✍️देव पिंपळे मुल प्रतिनिधी ✍️
कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या जानाळा–पोंभूर्णा मार्गावरील सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकामाच्या निकृष्ट दर्जाविरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, तालुका मूलच्या वतीने मंगळवारी सकाळी ९ वाजता कांतापेठ येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. रस्ते व नाली बांधकामातील गंभीर त्रुटींमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, संबंधित प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
मागील वर्षभरापासून या मार्गावर सिमेंट काँक्रीट रस्ता व नालीचे बांधकाम सुरू आहे. मात्र, सुरुवातीपासूनच कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नाल्यांची उंची रस्त्याच्या व घरांच्या पातळीपेक्षा अधिक असल्याने सांडपाणी व पावसाचे पाणी थेट घरांमध्ये शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे परिसरातील अनेक कुटुंबांपुढे आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आंदोलनादरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बांधकामातील अनेक त्रुटींकडे लक्ष वेधले. रस्त्याच्या कडेला मुरूम टाकणे अपेक्षित असताना तेथे माती टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. तसेच सिमेंट काँक्रीट रस्त्याला मजबुती मिळण्यासाठी नियमानुसार २८ दिवस पाणी मारणे आवश्यक असताना केवळ ५ ते ७ दिवसच पाणी मारण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रस्त्यावरील काँक्रीट उखडू लागले असून गिट्टी बाहेर पडत आहे. दुसरीकडे नव्याने बांधण्यात आलेल्या नाल्यांनाही तडे गेल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या सर्व बाबींविरोधात काँग्रेसच्या वतीने चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, पोलिस प्रशासनाच्या मध्यस्थीने कंत्राटदाराचे प्रतिनिधी, संबंधित अधिकारी व काँग्रेसच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा झाली. यावेळी कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या शिष्टमंडळासोबत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल तसेच आंदोलकांनी मांडलेल्या सर्व समस्या व मागण्यांचे आठ दिवसांच्या आत निराकरण करण्यात येईल, तोपर्यंत संबंधित बांधकामाचे काम बंद ठेवण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले. या आश्वासनानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
या आंदोलनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव संतोष सिंह रावत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, नगराध्यक्ष एकता समर्थ, काँग्रेस तालुकाध्यक्ष गुरू गुरणुले, शहराध्यक्ष सुनील शेरकी, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, सरपंच दर्शना किन्नाके, वैशाली निकोडे, अनिल सोनुले यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




