अपघातात आई-वडील गमावलेल्या अनाथ भावंडांना पोटवार दांपत्याकडून आर्थिक मदत
✍️देव पिंपळे मुल प्रतिनिधी✍️
मूल : लोकसभा निवडणुकीच्या दिवशी झालेल्या दुर्दैवी अपघातात आई-वडील गमावलेल्या यश व केतन संजय जराते या अनाथ भावंडांच्या शिक्षणासाठी मंगेश अशोक पोटवार व सरिता पोटवार यांनी पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे.
पोटवार दांपत्याने या दोन्ही मुलांच्या शैक्षणिक भवितव्याची जबाबदारी स्वीकारत त्यांना दत्तक घेतले असून, त्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी दरवर्षी आर्थिक मदत केली जाते. याच उपक्रमाचा भाग म्हणून यावर्षीही मुलांच्या आजी सौ. आनंदीबाई बालाजी जराते यांच्याकडे शैक्षणिक खर्चासाठी रोख रक्कम सुपूर्द करण्यात आली.
यावेळी मंगेश पोटवार यांनी सांगितले की, आई-वडिलांच्या निधनानंतर मुलांचा सांभाळ करणाऱ्या वृद्ध आजी-आजोबांवर आर्थिक ताण पडू नये आणि मुलांचे शिक्षण अखंड सुरू राहावे, या हेतूने ही मदत दिली जाते. समाजातील गरजू व वंचित घटकांना आधार देण्याची भावना जपण्यासाठी हा उपक्रम सातत्याने राबविला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी हा सामाजिक उपक्रम राबवून या अनाथ भावंडांना आर्थिक सहाय्य करण्यात येते. या संवेदनशील आणि समाजोपयोगी कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.
या प्रसंगी सरिता पोटवार, ईश्वर जराते तसेच गावातील महिला भगिनी उपस्थित होत्या.





