Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedराजुरा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय परिसर अंधारात; उपचारासाठी येणाऱ्यांना अंधारातच करावी लागते वाटचाल.

राजुरा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय परिसर अंधारात; उपचारासाठी येणाऱ्यांना अंधारातच करावी लागते वाटचाल.

राजुरा रुग्णालयातील प्रकाशव्यवस्था कोलमडली.

राजुरा तालुका प्रतिनिधी:- शहरातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय राजुरा परिसरात रात्रीच्या वेळी प्रकाशव्यवस्थेचा पूर्णपणे अभाव असल्याचे चित्र समोर आले आहे. रुग्णालयासारख्या अत्यावश्यक सेवास्थळी अंधाराचे साम्राज्य पसरल्याने रुग्ण त्यांच्या नातेवाईकांना तसेच नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
रात्री आपत्कालीन उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना रुग्णालयाच्या आवारात प्रवेश करताना अक्षरशः जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. परिसरात पुरेशी लाईट नसल्याने पाय घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना या अंधारामुळे अधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रुग्णालयाच्या मुख्य इमारतीसमोरील रस्ता पार्किंग परिसर व प्रवेशमार्ग येथे दिव्यांची व्यवस्था नसल्याने संपूर्ण भाग अंधारमय दिसून येतो. काही ठिकाणी उभारलेले खांब असूनही त्यावर दिवे कार्यरत नसल्याचे दिसते. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
रुग्णालय हे नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेले महत्त्वाचे केंद्र असल्याने येथे मूलभूत सुविधा उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. मात्र प्रकाशासारखी प्राथमिक सुविधा नसल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन रुग्णालय परिसरात योग्य ती प्रकाशव्यवस्था करावी अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी व नागरिकांच्या सोयीसाठी त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments